Sinhagad road pune news marathi : शिक्षणात मन रमत नसल्याने आणि अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे एका १६ वर्षीय मुलाने घरात चिठ्ठी लिहून घर सोडल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता (Sinhagad road pune )परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस चौकी (सिंहगड रस्ता पोलीस ठाणे) येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मुलाचा शोध घेत आहेत.
तक्रारदार हे सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर भागात राहतात आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा १६ वर्षांचा मुलगा सदाशिव पेठेतील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिकत आहे. त्याला शिक्षणात रस नसल्याने तो वारंवार शिकण्याची इच्छा नसल्याचे वडिलांना सांगत असे; मात्र कुटुंबीय त्याची समजूत काढत होते.
शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी मुलगा नेहमीप्रमाणे सायकलवरून महाविद्यालयात गेला होता. दुपारी दीडच्या सुमारास त्याने वडिलांना फोन करून घरी आल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीय कामावरून सायंकाळी घरी परतले असता मुलगा घरात नव्हता, तसेच त्याचा मोबाईलही घरीच मिळून आला. घरात शोध घेतला असता मुलाने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी आढळून आली.
“मला शिक्षण करायचे नाही, शिक्षणात आवड उरलेली नाही. समोरासमोर सांगण्याची हिंमत नव्हती म्हणून चिठ्ठी लिहित आहे. मला समजून घ्या आणि शोधण्याचा प्रयत्न करू नका,” असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहून मुलगा निघून गेला होता. इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो दुपारी पावणेचारच्या सुमारास एकटाच खाली उतरून जाताना स्पष्ट दिसला आहे.
सगेसोयरे आणि मित्रांकडे कसून शोध घेऊनही मुलगा न सापडल्याने, तो अल्पवयीन असल्याने त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत वडिलांनी पोलिसांत फिर्याद नोंदवली.
मुलाचे वर्णन :
वय १६ वर्षे, रंग गोरा, मध्यम बांधा, उंची साधारण ५ फूट, चेहरा गोल, डोळ्याला चष्मा. अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, निळी पँट, डोक्यात पांढरी टोपी आणि पायात काळी चप्पल. या वर्णनाचा मुलगा कोठे आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.