Yerwada pune kidnapping news :येरवडा परिसरातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Yerwada pune kidnapping news : येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातून २२ वर्षीय तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमन आशिष राय (वय २५, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. पांडू लमान वस्ती, गंगुबाई हिलजवळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांनी दिलेल्या जबाबावरून ही कारवाई करण्यात आली आहे. अमन राय हे खराडी येथे कर्तव्यावर असताना त्यांच्या पत्नीने त्यांना फोन करून बहीण पूजा आशिष राय (वय २२) ही दुपारी ३ वाजल्यापासून घरात नसल्याचे कळवले. अमन यांनी तात्काळ घरी येऊन चौकशी केली असता, आई व पत्नी दुपारी झोपले असताना पूजा कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याचे समोर आले.

परिसरात आणि नातेवाइकांकडे शोध घेऊनही तिचा पत्ता न लागल्याने अज्ञात व्यक्तीने तिला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यावरून अमन राय यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार दिली.

बेपत्ता तरुणीचे वर्णन:

  • नाव: पूजा आशिष राय (वय २२ वर्षे)

  • शारीरिक वर्णन: रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट ४ इंच, अंगकाठी सडपातळ, काळे लांब केस, सरळ नाक.

  • अंगावरील कपडे: आकाशी रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगीज.

  • दागिने व खूण: कानात पिवळ्या धातूचे टॉप्स, नाकात पिवळ्या धातूची फुली तसेच उजव्या हातावर इंग्रजीत ‘POOJA’ असे गोंदलेले आहे.

येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तरुणीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक कार्यरत करण्यात आले आहे. या घटनेबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment