Pune Deccan News : पुण्यात जुन्या वादातून अल्पवयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; डेक्कन नदीपात्रातील धक्कादायक घटना

Pune Deccan News Today : शहरातील डेक्कन परिसरातील भिडे पुलाजवळील नदीपात्रात जुन्या वादाचा राग मनात धरून एका १६ वर्षीय विद्यार्थ्यावर कोयत्यासह धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात संबंधित टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.Pune Deccan News Today in marathi

शाळेतील जुन्या वादातून थरार

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थी आणि हल्लेखोर यांच्यात काही महिन्यांपूर्वी दहावीच्या परीक्षेदरम्यान किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या वेळी झालेल्या मारहाणीची माहिती पोलिसांना देण्यात आली होती, मात्र पालकांच्या मध्यस्थीने समझोता होऊन वाद मिटवण्यात आला होता. तरीही आरोपींच्या मनात याचा राग कायम होता.

भेटायला बोलावून रचला सापळा

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास मित्राने तक्रारदाराला बोलण्याच्या बहाण्याने भिडे पुलाजवळील नदीपात्रात बोलावून घेतले. तक्रारदार आपल्या दोन मित्रांसह तेथे पोहोचताच, पूर्ववैमनस्यातून आरोपींनी ‘पोलिसांत आमची नावे का सांगितली?’ असा जाब विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कमरेला लपवलेला कोयता काढून थेट डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला.

डोक्यावर आणि हातावर सपासप वार

जीव वाचवण्यासाठी पीडित मुलगा पळत असताना खाली पडला. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या इतर तरुणांनी हातात कोयते आणि धारदार शस्त्रे घेऊन त्याच्यावर हल्ला चढवला. डोक्यात, डोक्याच्या मागच्या बाजूस आणि हात आडवा केला असता हातावर व बोटांवर वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक जमा होऊ लागल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

रुग्णालयात उपचार सुरू; पोलिसांकडून तपास सुरू

घटनेनंतर सोबत असलेल्या मित्रांनी जखमी विद्यार्थ्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला स्वारगेट परिसरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब नोंदवून घेतला आहे. जीवे मारण्याच्या उद्देशाने कट रचून हा हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Comment